सुट्टीवरून कॉलेजला जाताना ‘त्याची’ दुचाकी दुभाजकाला धडकली अन् पुढं घडलं विपरीत…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला आणि या अपघातात त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे; तर साहिल पांडुरंग हजारे (वय 19, दोघेही रा. खेराडे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीयूष कोरे व साहिल हजारे हे पुणे येथील सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंगला आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने ते खेराडे वांगी या त्यांच्या गावी गेले होते. सोमवारी खेराडेे वांगीतून ते दुचाकीवरून पुण्याला निघाले होते. पहाटे 4.30 च्या सुमारास ते जोशी विहीर परिसरात आले. तेथे भरधाव दुचाकीवरचा पीयूषचा ताबा सुटला आणि दुचाकी दुभाजकाला धडकली. परिसरातील लोकांनी त्यांना रुग्णवाहिकेने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पीयूषचा मृत्यू झाला; तर साहिल हा गंभीर जखमी झाला आहे.