सातारा प्रतिनिधी | शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख पठाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त तसेच हुंड्याकरिता जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व पतीचा मित्र या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील मोमीना शेख हिचा विवाह शिरवळ येथील शाहरुख पठाण याच्याबरोबर २०२० रोजी झाला होता. मोमीनाला पती शाहरुख, सासू सलीमा उर्फ अमीना इस्माईल पठाण हे दोघे स्वयंपाक व इतर कारणावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते. शाहरुख हा काहीही काम करत नसल्याने विनाकारण मारहाण करीत सतत दारू व गांजा पिऊन आल्यावर काहीएक कारण नसताना मारहाण करत येथे राहायचे असेल तर वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणत. दरम्यान, मित्राच्या सांगण्यावरुन पती शाहरुखने मोमीनावर संशय घेत सतत मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे तिने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी पती शाहरुख ईस्माईल पठाण, सासू सलिमा उर्फ अमिना ईस्माईल पठाण, मिञ सोन्या पंडित यांच्याविरुध्द वडील करीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहरुख पठाण, सोन्या पंडित यांना अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.