सातारा प्रतिनिधी | मान्सूनची राज्यात एन्ट्री होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या या तुफान बॅटिंगने अनेक पूरस्थिती निर्माण होऊन ठिकाणी गाड्या, जनावरे, वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका तरुणाचा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटावमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. या पावसामुळे माण तालुक्यातील अनेक रस्तेही बंद झाले आहेत. अचानक आलेल्या तुफान पावसाने शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्कील झाले. अशीच परिस्थिती उद्धवल्याने एका तरुणाने थेट आपली स्पेंडर गाडी खांद्यावरुन उचलून घेतली अन् चिखलातून वाट काढत बाहेर आणली.
माण तालुक्यातील कुळकजाईमधील तरुणाने हा अचंबित करणारा पराक्रम केला. कुळकजाईमधील विनय घोरपडे हा तरुण रानात गेला असता तुफान पावसाने बाहेर पडणे मुश्कील झाले. रस्त्यावर चिखल झाल्याने त्याला गाडी बाहेर काढणेही शक्य नव्हते. त्यामुळेच या धाडसी पठ्ठ्याने थेट गाडी खांद्यावर घेतली अन् चिखलातून बाहेर काढली. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी हा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी सातारचा बाहुबली म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी शाब्बास रे पठ्ठ्या म्हणत या तरुणाचे कौतुक केले आहे.