सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात होणाऱ्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला व सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या वतीने पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय महिलांच्या वतीने गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिभा शेलार, समिंद्रा जाधव, नलिनी जाधव, अंजली शिंदे, जयश्री शेलार, अंजली जठार, सुनीशा शहा आदी उपस्थित होत्या.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात विविध ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम होतात. यामध्ये अश्लील नृत्याचे प्रकार होतात, तसेच काही हॉटेल्समध्येही असे नृत्यांचे कार्यक्रम घेतले जातात. सातारा जिल्ह्याला सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. हे महत्त्व टिकून राहणे आवश्यक आहे.
अशा अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमांमुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे, तसेच त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमावर बंदी घालणे गरजेचे आहे. अशा नृत्यांच्या कार्यक्रमामुळे तरुण पिढीवर परिणाम होत असून, वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलून अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये. कोणी कार्यक्रम केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.