सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवून सातारा पोलिसांनी अवघ्या काही तासात हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला. खून झालेली महिला पुण्यातील वाकड परिसरातून बेपत्ता होती.
खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असल्यानं संशयितानं डोक्यात हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंर दोन दिवसांनी संशयितानेच तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती. जयश्री विनय मोरे (रा. राजमुद्रा पेट्रोल पंपाशेजारी, मारूंजी, ता. मुळशी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे.
ट्रक चालकाने पाहिला मृतदेह
खंबाटकी घाटात बंद पडलेला मालट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावून चालक दरीकडेला उभा असताना त्याला दरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढला. मृत महिलेचं वय अदाजे २७ वर्ष होतं. तसेच डोक्यात लोखडी वस्तुने पाच-सहा घाव घालण्यात आल्याचं आढळून आल्यानं हा घातपाताचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने धागेदोरे मिळवायला सुरूवात केली.
बेपत्ता नोंदीवरून घटनेचा झाला उलगडा
पोलिसांनी मिसिंग व्यक्तींची माहिती घेतली असता पुण्यातील वाकड हद्दीतून एक महिला बेपत्ता असल्याचे समजलं. त्या बेपत्ता महिलेले वर्णन मृत महिलेशी जुळले. मृत महिला ही संशयित आरोपी दीनेश पोपट ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. संशयितानेच पोलीस ठाण्यात तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती. खंबाटकी घाटात मृतदेह आढळल्यानंतर फलटणचे डीवायएसपी राहुल धस, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात मृत महिलेची माहिती मिळवली.
कारमध्येच केली हत्या
जयश्री मोरे ही चार वर्षांपासून संशयित दीनेश ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याला सोडून ती आई-वडीलांसोबत राहायला जाणार होती. त्यामुळे तो चिडून होता. २४ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने तिला बोलावून घेतलं. कारमधून तिला बाहेर घेऊन गेला. कारमध्येच त्याने हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केली. तसाच तो खंबाटाकी घाटात आला. मृतदेह दरीत टाकून मध्यरात्री पुण्याला गेला.
मुलाला बेवारस स्थितीत दिलं सोडून
मृत महिलेच्या ३ वर्षाच्या मुलाला संशयितानं आळंदीत बेवारस स्थितीत सोडून दिलं. सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. मुलाला आजोबांच्या ताब्यात दिलं. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताला कळली. त्यानंतर मंगळवारी संशयित दीनेश ठोंबरे याने वाकड पोलिसांत जयश्री मोरेच्या मिसिंगची तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी काही तासात या गुन्ह्याचा छडा लावला.