कराड प्रतिनिधी | दुचाकीला भरधाव
अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला. पुणे – बंगळूर महामार्गावर कराड येथील पंकज हॉटेलसमोर बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.
प्रियांका अमोल जाधव (वय ३१, रा. संजयनगर, मसूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोहर आनंदा नायकवडी (रा. चांभारवाडाजवळ, ता. वाळवा, जि. सांगली) असे जखमी अपघातात झालेल्या नाव दुचाकीस्वाराचे आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नायकवडी हे दुचाकीवरून (एमएच १० सीजी १६९५) कामानिमित्त चाफळकडे गेले होते. काम आटोपून ते परत घरी वाळवा येथे जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर आले. त्याठिकाणी प्रियांका जाधव यांनी माझी गाडी चुकली आहे. मला कराडमध्ये सोडा, अर्जंट काम आहे, असे सांगून लिफ्ट मागितली.
माणुसकी म्हणून नायकवडी यांनी त्यांना आपल्या गाडीवर बसून कराडकडे येत होते. महामार्गावर येथील पंकज हॉटेलसमोर आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली.
ही धडक एवढी जोरात होती, की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले, तर प्रियांका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, धडक देणारे वाहन अपघात स्थळावरून पसार झाले होते. नागरिकांनी अपघाताची माहिती डीपी जैन कंपनीचे कर्मचारी दस्तगीर आगा यांना दिली.
आगा यांनी महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी व कराड शहर पोलिस ठाण्यातील अपघात विभागाला खबर दिली. माहिती मिळताच अपघात विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक एम. जी. चव्हाण, धीरज चतुर यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.