देवदर्शनाला जाताना झाला अपघात; पत्नी ठार तर पती गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | एक दाम्पत्य चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. रहिमतपूर ते तारगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी आरफळ कॉलनी परिसरात दाम्पत्याची दुचाकी बोलेरोवर आदळून अपघात झाला. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे.

सौ. कांचन भरत जाधव असे ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती भरत शंकर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, किरोली, ता. कोरेगाव येथून भरत व कांचन हे दोघे रहिमतपूर येथील चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. रहिमतपूर ते तारगाव रस्त्याने जात असताना ते आरफळ कॉलनी परिसरात आले. त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीची धडक बसली. यामध्ये भरत यांची दुचाकी होलपडून पाठिमागून येत असलेल्या बोलेरोवर जावून आदळली.

या अपघातात कांचन यांचा बोलेरोखाली आल्याने मृत्यू झाला. तर भरत जाधव हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे किरोली गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत रहिमतपूर पोलिस ठाण्यात सुरू होते.