सातारा प्रतिनिधी । दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तासभर झोडपून काढले. सकाळपासून राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात विविध शहरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. पावसाचा जोर आजही काही ठिकाणी कायम असून सातारासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कृष्णा, कोयना आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कालपासून पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजा आणि गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अतिजोरदार परतीच्या पावसाची तीव्रता खान्देश, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात असणार आहे. तर गुरुवार दि. २६ सप्टेंबरला मुंबई, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, खटाव तालुक्यात ढगाळ वातावरण पहायाला मिळत होते. शनिवारी दुपारी चारनंतर कराडसह पाटण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारे देखील पावसाने हजेरी लावली.