कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून आज ‘यावेळी’ पाणी सोडण्यात येणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाउस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळी धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून नदीपात्रात पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली आहे.

कोयना नदीपात्रात १०५० क्युसेक्स पाणी सोडणार

कोयना धरणाचा पायथा वीजगृह मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता कार्यान्वित केला जाणार आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक्स इतका विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यानं कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. तसेच हवामान विभागानं आणखी दोन दिवस सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. या पार्श्वभूमीवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणात प्रतिसेकंद ६० हजार क्युसेक्स पाण्याची आवक

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कोयनानगर येथे ४२ मिलीमीटर, नवजा येथे २४ आणि महाबळेश्वरमध्ये ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद ६० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असून धरणात २ टीएमसी पाणी वाढलं आहे. सध्या धरणात ६२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अद्याप पाऊस काळ शिल्लक असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली आहे.