पाटण प्रतिनिधी | आपत्ती काळात प्रशासनाशी संपर्क करता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना नुकतेच सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत. या फोनद्वारे पाटण तालुक्यातील टोळेगाव ग्रामस्थांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथील ग्रामस्थांनी सॅटेलाईट फोनद्वारे संवाद साधल्यानंतर समाधानही व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे पाटण तालुक्यातील टोळेगावची पाहणी करण्यासाठी गेले होते. उपविभागीय अधिकारी गाडे भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा त्यांनी वापर केला. संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती दरम्यान सॅटेलाईटच्या फोनचा ग्रामस्थांनी सक्षमपणे वापर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सदर गावातील नागरिकांना गावाजवळच्या मंदिरात किंवा लगतच्या सुरक्षित ठिकाणी, शाळेत थांबण्याबाबत उपविभागीय अधिकारी गाडे यांनी सूचना दिल्या. त्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होण्याचे त्यांनी मान्य केले आहे. यापूर्वी त्या डोंगरकडाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेली आहे. मात्र पाऊस सुरू असल्याने या कड्याची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या संबंधित विभागाला उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या.
सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील ग्रामस्थांनी साधला सॅटेलाईट फोनद्वारे संवाद pic.twitter.com/VsEWb9hi90
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 25, 2023
सॅटेलाइट फोन कसा काम करतो?
भारतासह जगभरात अनेक दशकांपासून सॅटेलाइट फोनचा वापर केला जात आहे. सिग्नलची ताकद कमी असेल किंवा सिग्नल अजिबात येत नाही अशा ठिकाणी ते काम करू शकतात. हे त्याच्या नावाप्रमाणे उपग्रहाच्या मदतीने काम करते. त्याची ऑडिओ गुणवत्ता इतकी चांगली आहे की ती सामान्य स्मार्टफोनमधूनही उपलब्ध होत नाही. तथापि, प्रत्येकाला ते वापरण्याची परवानगी नाही. जर आपण त्याच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो तर ते देशाच्या कोणत्याही भागात वापरले जाऊ शकते आणि आपण ते विमान प्रवास किंवा जहाजात देखील वापरू शकता. भारतात फक्त निवडक लोकांनाच सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी आहे. ते वापरण्याची परवानगी केवळ संरक्षण, लष्कर, बीएसएफसह आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे. यासह इतर काही निवडक लोकं देखील हे वापरू शकतात.