सातारा प्रतिनिधी | “या ठिकाणच्या पूर्वीच्या माणसाने स्वतःच्या घराभोवतालची घरे पेटवली होती. मात्र, सगळ्याची घरे पेटवल्यानंतर आपले घर पेटेल याचा विचार त्यांनी केला नव्हता. त्यामध्ये त्यांचेही घर जळून खाक झाले. या पूर्वीच्या खासदाराने फलटण तालुक्यसोबतच सर्वत्र धुमाकूळ घातला होता. त्यामुळे संजीवराजे, मी, मोहिते-पाटील कुटुंबांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कोणासोबत दगाफटका होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत होतो. त्यानंतर ठरवल्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे म्हणून आम्ही काम करीत होतो, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी म्हंटले.
फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी प्रवेश केला. यावेळी प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी महायुती सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
इडी आणि अनेक यंत्रणांचा वापर…
या ठिकाणच्या माणसाने ईडी व अनेक यंत्रणांचा वापर केला होता. मात्र, आम्ही सर्वांनी निश्चय केला होता. त्यामुळे काही त्रास झाला नाही. आता येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. त्यासाठी आणखी काही सभा घेण्याची माझी तयारी असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.