कराड प्रतिनिधी | मृताची ओळख पटण्यापुर्वीच खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. डीवायएसपी अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील या़च्या मार्गदर्शनाखाली तपास करून या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शकील अन्वर शेख (वय 20, रा. दैत्यनिवारणों मंदीर कराड) आणि कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय 2, रा. मुजावर कॉलनी, कराड), अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे.
आव्हानात्मक गुन्ह्याचा पाच दिवसात छडा
कराडच्या जुन्या कोयना पुलाखाली दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 30 ते 35 वयोगटातील अनोळखी पुरूषाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. अज्ञाताचा खून करून मृतदेह सिमेटच्या पाईपला बांधून नदीपात्रात टाकला होता. घटना उघडकीस आल्यापासून आजपर्यंत मृताची ओळख पटलेली नसतानाही पोलिसांनी कौशल्याने तपास करत गुन्ह्याची उकल केली आहे.
चार दिवस मृतदेह पाण्याखाली
सिमेटच्या पाईपला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह 4 दिवस पाण्यात राहिल्याने पुर्णतः सडलेला होता. मृतदेहाच्या अंगावरील कपडे, हातावरील गोंदलेले नाव व चिन्हावरून ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. पोलिसांची पथके कराड, मुंबई, पुणे, चिपळूणसह कर्नाटक राज्यात तपासासाठी पाठविण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांना संशयितांची माहिती मिळवण्यात यश आले. याप्रकरणी शकील अन्वर शेख (वय 20, रा. दैत्यनिवारणों मंदीर कराड) आणि कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय 2, रा. मुजावर कॉलनी, कराड) यांना ताब्यात घेतले. आणखी एका सहकाऱ्याच्या मदतीने खुन केल्याची कबुली दोन्ही संशयितांनी दिली. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली.