कराड प्रतिनिधी | “न्यायालयात दाखल खटला मागे घे,” असे म्हणत एका युवकावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनाजी सत्यवान अदलिंगे (वय 30, रा. गोळेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. तुकाराम सुभाष माळी (रा. गोळेश्वर) व गणपती नागनाथ माळी (रा. बैलबाजार रोड, मलकापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोळेश्वर गावातील धनाजी अदलिंगे हा चार दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरात एकटाच टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी तुकाराम माळी व गणपती माळी हे दोघे त्याच्या घरासमोर आले. त्यांनी हाक मारून या दोघांनी त्याला घराबाहेर बोलवले.
धनाजी घराबाहेर आल्यानंतर त्याला “न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घे, नाहीतर तुला सोडत नाही,” असे म्हणून तुकाराम माळी याने धमकी दिली. तसेच कोयत्याने धनाजीच्या डोक्यात वार केला. गणपती माळी याने लोखंडी पाईपने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात धनाजी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत धनाजी अदलिंगे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.