पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या रुकसाना अयुब पाटील (वय ४०) महिलेवर गवारेड्याने अचानकपणे हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या रुकसाना अयुब पाटील (वय ४०) महिलेवर गवारेड्याने अचानकपणे शनिवारी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला ग्रामस्थांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीला आणले. मात्र, आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे वनविभागाच्या खासगी गाडीतून महिलेला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गाडीत महिलेला बसता येत नसल्याने तब्बल दीड तासानंतर १०८ च्या रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कराडला हलविण्यात आले.
घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट करून पंचनामाही केला आहे. यावेळी जयवंतराव शेलार, राजाभाऊ शेलार, दयानंद नलवडे, सत्यजित शेलार, शैलेंद्र शेलार, बाळासाहेब कदम, सचिन कदम यांनी आरोग्य केंद्रात भेट देऊन पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरीक, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.