कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.5 TMC ने वाढ; प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC ने वाढ झाली आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद 30 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 153, नवजामध्ये 124 आणि कोयनानगरमध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस आणि पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा 19 TMC वर पोहोचला आहे.

पावसाचे आगार मानल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील 4-5 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, आता पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. धो-धो पाऊस कोसळू लागला आहे. यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 1.5 TMC ने पाणीसाठा वाढला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक 30 हजार क्युसेक झाली आहे.

पूर्व भागात दमदार पावसाची प्रतिक्षा

सातारा जिल्ह्याच्या पुर्वेकडील भागात अजुनही दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. मागील चार-पाच दिवसांपुर्वी पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीपाची टोकणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली. पूर्व भागात अद्याप दमदार पाऊस सुरू झाला नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उगवणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पश्चिम भागातील दमदार पावसामुळे महाबळेश्वर, नवजा परिसरातील धबधबे कोसळू लागले आहेत. डोंगरदर्‍या हिरवाईने नटल्या आहेत. निसर्गाचे खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वर, कोयनानगरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील लिंगमळा, ओझर्डे, ठोसेघर येथील प्रसिध्द धबधब्यांसह लहान-मोठे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.