पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला; कोयनेचा पाणीसाठा झाला 83.35 TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कमी झालेला पावसाचा जोर आता हळूहळू वाढू लागला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या नवजा येथे आठवडाभरानंतर सर्वाधिक 39 मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढलयामुळे पाणीसाठा 83.35 टीएमसी इतका झाला आहे.

सातारा जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धापासून ते आॅगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणातील पाणीसाठाही जलदगतीने भारला. मात्र, मागील आठवड्यापासून अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणीसाथा कमी प्रमाणात होऊ लागला. कोयना धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. या ठिकाणी धरणातील पाणीसाठा वाढला नसलयामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शनिवारपासून पावसात थोडी वाढ झालेली आहे. कोयना धरणक्षेत्रातील भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान, रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगरला 28 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला 39 आणि महाबळेश्वरमध्ये 28 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला 3206 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर नवजाला सर्वाधिक 4566 आणि महाबळेश्वर येथे 4228 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सकाळच्या सुमारास कोयना धरणात 2586 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. शनिवारच्या तुलनेत धरणात येणाऱ्या पाणी आवकमध्ये वाढ झाली. तर धरणातील पाणीसाठा 83.35 टीएमसी साठा झाला. टक्केवारीत हे प्रमाण 79.19 इतके आहे.