कराड प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांत पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी या तालुक्यातील मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोरणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थ, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोरणा गुरेघर धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. पाटण तालुक्यातील मोरणा नदीवरती गुरेघर या ठिकाणी हे धरण आले असून, या मध्यम प्रकल्पामुळे विभागातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या धरणाचे वक्रदरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुढील 12 तासामध्ये प्रकल्पाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. तसेच सांडव्यावरुन पाण्याचा जास्त प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानंतर विद्युत गृहातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
धरणातून ज्यावेळी पाणी सोडले जाते त्यावेळी सोडलेल्या पाण्यामुळे आणि सुरू असलेल्या पावसामुळे छोटे- मोठे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता असते. परंतु यावेळी या सर्व बाबींचा विचार करून पाणीसाठा वाढत असल्याचे लक्षात येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी आगींद्रच प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.