उधारीच्या पैशावरून ‘त्यानं’ काढला ‘त्याचा’ कायमचा काटा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर गावात राहणाऱ्या शिवाजी लक्ष्मण सावंत यांचा 5 सप्टेंबरला संशयास्पदरित्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता पोलिस चौकशीत पशुखाद्याच्या उधारीवरून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एका संशयिताला गजाआड केले असून दिलीप लक्ष्मण कराळे असे त्याचे नाव असून सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील कुसूर येथे शिवाजी सावंत यांचे पशुखाद्याचे दुकान आहे. तेथून कराळे याने पशुखाद्य नेले होते. त्याची जवळपास 20 हजाराची उधारी झाली होती. ती उधारी द्यावी यासाठी सावंत यांनी कराळे याच्या मागे तगादा लावला होता. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता.

दरम्यान, सावंत आपल्या घरातून 2 सप्टेबरला बेपत्ता झाले होते.सावंत बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचा भाऊ बाळासाहेब सावंत यांनी दिली होती. दि. 5 सप्टेंबरला त्यांचा संशयास्पद मृतदेह सापडला. त्यांच्या अंगावर हत्याराने वार केल्याचे व्रण होते. शवविच्छेदन अहवालातूनही त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या स्वंतत्र पथकासह तालुक्याच्या डीबी पथकाने या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावताना कराळेकडे चौकशी केली. यातून उधारीवरून वाद झाल्यानंतर कराळेने पैसे देतो, असे सांगून सावंतला बोलावले होते.

तेथे त्याच्यावर विळ्याने सपासप वार केले. त्यात सावंतचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बांधाच्या आडाला टाकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप हे करत आहेत.