कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ, चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार उडवलाय. संततधार पावसामुळं महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. बिरमणी – महाबळेश्वरकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसीनं वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातलाय. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे चोवीस तासात विक्रमी ६५७ मिलीमीटर पाऊस झालाय. संततधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून कोयना धरणात प्रतिसेकंद ७० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

कोयना, कृष्णा नद्यांना पूर

संपूर्ण जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाचा जोर होता. त्यामुळे नद्यांना पूर आलाय. सध्या नद्यांचे पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून शेतांची तळी झाली आहेत.

कोयना धरणातील पाणीसाठा ६० टीएमसी

संततधार पावसामुळं कोयना धरणात प्रतिसेकंद ७० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासात ६ टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता धरणातील पाणीसाठा ६०.४२ टीएमसीवर पोहोचला आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून लवकरच पाणी सोडलं जावू शकतं.

महाबळेश्वरात सर्वाधिक २४५ मिलीमीटर पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात सर्वाधित २४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरमध्ये १७६ मिलीमीटर आणि नवजा येथे २३६ मिलीमीटर पाऊस झालाय. पाटण तालुक्यातील मराठवाडी आणि जावली तालुक्यातील महू धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.