कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ज्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत आहे. सध्या कराड ते चिपळूण या मार्गावरील मुख्य महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून रविवार आणि सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावर चिखल निर्माण झाला. पाटण तालुक्यातील कोयनानगर जवळील वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेला पर्यायी रस्ता सोमवारी सकाळी पाण्याच्या तडाख्याने वाहून गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराकडून मोरी टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यासाठी ठेकेदाराने मातीचा वापर केला होता. मात्र, रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना महापूर आल्याने पाण्याचा जोरदार लोंढा मोरीवर धडकला आणि ती वाहून गेली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक वाहने ठिकठिकाणी अडकली.
वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या कराड-चिपळूण महामार्गाचे गेल्या २ वर्षांपासून काम सुरू असून अजूनही मुख्य पूल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरच संपूर्ण वाहतूक सुरू होती. मात्र, या रस्त्याचा दर्जा अत्यंत हलका असल्याने अवघ्या काही तासांतच तो वाहून गेला आहे. सध्या या मार्गावर प्रवास करणे धोकादायक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक बनले आहे.