युवकास पाठलाग करून मारहाण; अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गोटखिंडी, जि.सांगली येथील बहिणीकडुन जेवण करुन कार्वेतील घरी निघालेल्या युवकास स्विफ्ट कारमधुन आलेल्या सहाजणांनी पाठलाग करुन मारहाण करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील गोंदी गावच्या हद्दीत घडली. मारहाण प्रकरणी पोलिसांनी संबंधित अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संकेत सुरेश मंडले (वय २५. रा. कार्वे) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. संकेत मंडले हा त्याचा मित्र अमन मुबारक मुल्ला याच्याबरोबर गोट खिंडी (जि.सांगली) येथील बहिणीकडे जेवण करण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. ते परत येऊन कार्वेतील घरी जाताना गोंदीजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी अमन हा दुचाकीवरच बसला होता. त्यादरम्यान पाठिमागुन पाठलाग करत स्विफ्ट गाडीतुन (एमएच १२ एसक्यु ६७०५) आलेल्या सहा जणांनी संबंधित दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये अमन हा गाडीवरुन खाली पडला.

संबंधित सहा जणांच्या हातात दगड आणि लोखंडी पाईप होती. ते अमनच्या मागे लागल्यावर तो ऊसाच्या शेतात पळुन गेला आणि संकेत मंडले हा त्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी संकेतला “तु आसीफ मुलानी यास ओळखतोस का?” असे म्हणत त्याच्या पाठीवर, पायावर, पोटावर लाथाबुक्या आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. तर दुचाकी गाडीचीही मोडतोड करुन नुकसान केले. त्यानंतर त्यांनी संकेतला गाडीतुन मारहाण करत रेठरे कारखाना रस्त्यालाही नेऊन तेथेही मारहाण केली. याप्रकरणी संबंधित अनोळखी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बिद्री पुढील तपास करत आहेत.