सातारा प्रतिनिधी । बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होत असल्याच्या कारणातून परप्रांतीय सख्ख्या भावाने 19 वर्षीय बहिणीचा स्कार्फने गळा आवळून खून केला. शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने दहा दिवसांमध्ये हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित शंकर जिमदार महतो (वय २४, मूळ रा. माझीनियापत्ती, ता. माझी सारन जि. छपरा रा. बिहार सध्या रा. पळशी ता. खंडाळा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील गुठाळे याठिकाणी खळवी नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाखाली 19 वर्षीय परप्रांतीय युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दि.16 डिसेंबर रोजी आढळून आला होता. तपासाअंती हा मृतदेह मनिषाकुमारी जिमदार महतो (वय 19) हिचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार स्वप्निल महांगरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मित मयत म्हणून नोंद करण्यात आली होती.
यावेळी घटनास्थळाची परिस्थितीवरून संबंधित युवतीचा घातपात असण्याची शक्यता गृहीत धरुन शिरवळ पोलिसांनी तपास केला. दरम्यान, मनिषाकुमारीचे गावातील युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याने भाऊ शंकर महतो यानेच गळा आवळून खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. शंकर महतो याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार दि. 29 डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे अधिक तपास करीत आहे.