सातारा प्रतिनिधी । सातारा येथील समर्थ सदनच्या रस्त्यावर चोरट्याने शिक्षिकेला धक्का देऊन गळ्यातील सुमारे साडेसहा तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केल्याप्रकरणी एकाला शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
शंकर नंदकुमार कदम (वय ४२, रा. शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत आशादेवी अजित साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या राजधानी टॉवरजवळील समर्थ सदनच्या रस्त्याने पायी चालल्या होत्या.
या वेळी पाठीमागून आलेल्या तोंडाला काळा रुमाल बांधलेल्या चोरट्याने धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून लंपास केले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून साळुंखे यांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे, तसेच चौकशीत त्याने एक दुचाकी चोरीचीही कबुली दिली आहे.
ती दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कुमार ढेरे, हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, ज्योतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, सुमीत मोरे, संग्राम फडतरे व गोपनीय शाखेचे हवालदार अमोल साळुंखे व चेतन ठेपणे हे या कारवाईत सहभागी होते.