सातारा प्रतिनिधी | गेल्या पाच दिवसापासून सातार्यात गणेश आगमन मिरवणूक ते विसर्जन दिवस डिजे वाजणार की नाही, यावरून चर्चा सुरू असल्याने गणेश मंडळांकडून डीजे आणि वाद्य वाजविण्याबाबत मागणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास वाद्यांवर कारवाई केली जाणार असून रात्री बारानंतर सर्व वाद्ये बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच होणार असून त्यात बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पोलिस करमणूक केंद्रात बुधवारी सायंकाळी गणेश मंडळ व पोलिस यांच्यामध्ये बैठक पार पाडली. यावेळी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी प्रशासनाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.सातार्यात यंदा गणेश आगमन सोहळा चर्चेला आला.
डिजेचा अक्षरश: दणदणाट होवू लागल्याने शाहूपुरी पोलिसांनी डिजे चालकांवर कारवाईचा दंडूका उगारत सिस्टिम जप्त करण्यास सुरुवात केली. डिजेच्या दणदणाटाने व्यापारी व गणेश मंडळे एकमेकांसमोर उभे राहिली. त्यातून वादावादीला सुरुवात होवून बाजारपेठेत खरेदी न करण्याचे बहिष्कार अस्त्र उगारण्यात आले. यामुळे गरमागरमी होवून पुढे हा वाद लोकप्रतिनिधींपर्यंत जात चिघळत गेला. अशातच विसर्जन मिरवणुकीच्या रात्री बारानंतरही पारंपरिक वाद्ये सुरु ठेवून चौपाटीही सुरु राहिली पाहिजे अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली.
पाच दिवसातील या पार्श्वभूमीवर बुधवारी गणेश मंडळ व पोलिस यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी भावना व्यक्त करत अडचणी सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने चार दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्याचा पुन्हा उहापोह झाला. डिजेला परवानगी मिळावी,
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारानंतर पारंपरिक वाद्ये वाजवणार, चौपाटी सुरु रहावी, 50 मीटर, 100 मीटर अंतरावर दोन मंडळांनी वाद्ये वाजवू नयेत ही अट रद्द करावी, डिजेबाबत न्यायालयाचे सर्व नियम, अटी पाळू, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी अशोक मोने, संतोष जाधव, आप्पा तुपे, शरद काटकर यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.
गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांचे बोलणे झाल्यानंतर त्याला उत्तर देताना डीवायएसपी राजीव नवले म्हणाले, कायदे सर्वांसाठी समान आहेत. मिरवणुका, उत्सव आनंदात पार पडावेत, हीच पोलिसांची भूमिका आहे. गतवर्षी विसर्जनादिवशी अचानक गर्दी होवून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये दोघेजण बेशुध्द पडले. ही सर्व वेळ का आली? याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. पूर्वी ढोल-ताशे, लेझीम हीच वाद्ये होती. यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. ध्वनी प्रदुषणाबाबत सर्वांनीच सतर्क असले पाहिजे. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने सर्वांना शेवटचे व निर्वाणीचे सांगतो, आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. रात्री बारानंतर वाद्ये ही बंदच केली जाणार, असा इशारा देण्यात आला.