सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीसदृश्य पाऊस हाेत आहे. यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कराड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३३ आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील या पावसामुळे प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे सायंकाळी पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.