सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; कोयना धरणाचा ‘इतका’ झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची महाबळेश्वरला 64 मिलीमीटरची झाली आहे. तर नवजालाही चांगला पाऊस झाला. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 93 टीएमसीवर गेला आहे.

सातारा जिल्ह्यात यंदा पावसाने काही प्रमाणात दडी मारल्यामुळे अद्यापही काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यात अजूनही काही भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. साधारणतः जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर जुलै महिन्यापर्यंत होता. त्यामुळे जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला. पुढील दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे बलकवडी आणि तारळी वगळता इतर धरणांत कमी पाणीसाठा राहिला. उरमोडी धरणात ६० टक्केही पाणीसाठा नाही. या धरणातील पाण्यावर माण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे.

सध्या सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या परतीचा पाऊस पडत असून पश्चिम भागातील कास, बामणोली, कोयनानगर, नवजा, तापोळा आणि कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

कोयना धारण भरण्यास अद्याप एवढ्या TMC ची गरज

सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 64 मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे 28 आणि नवजाला 37 मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे 5614 मिलीमीटर पडलेला आहे. तसेच कोयनेला 3993 आणि महाबळेश्वरला 5448 मिलीमीटर झाला आहे. तर सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात 5231 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण पाणीसाठा 93.77 टीएमसी झाला होता. तरीही धरण भरण्यासाठी 11 टीएमसीवर पाण्याची गरज आहे.