कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. धरण 25 टक्के भरले असून नवजा व महाबळेश्वर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC पाणीसाठा वाढला असून १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
कोयनानगर येथे 77 (1149) मिलिमीटर, नवजाला 98 (1657) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 150 (1667) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद 5 हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली असून, आज प्रतिसेकंद 16 हजार 18 क्युसेक नोंदली गेली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 27.27 टीएमसी झाला असून, पाणीपातळी 2071 फूट झाली आहे.
पश्चिम भागात चार दिवसांच्या उघडझापनंतर शनिवारपासून पावसाचा जोर वाढला. रविवारी आणि सोमवारीही पश्चिमेकडील कास, बामणोली, नवजा, कोयना, तापोळा तसेच महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे त्या भागातील ओढे, नाले पुन्हा भरुन वाहत आहेत. तसेच भात लागणीच्या कामालाही वेग आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याला आज एलो तर पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे हाती घेतली जात आहेत.