विडणीतील महिलेच्या खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास पोलीस देणार 1 लाखाचे बक्षीस

0
945
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील विडणी येथील उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल,’ अशी घोषणा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.

विडणी (ता. फलटण) गावाच्या हद्दीत पंचवीस फाटा येथे जाधव यांच्या ऊसाच्या शेतात सडलेल्या व अर्धवट अवस्थेमधील महिलेचे मृतदेहाचे अवयव दि. १७ जानेवारीला आढळून आले होते. सडलेला वास आल्याने ही घटना उघडकीस आली. या मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तू आढळून आल्याने हा खून नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत होता.

घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यामध्ये सुमारे १५ एकर उसाचे क्षेत्र मोकळे केल्यानंतर त्यांना मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्प, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सत्तूर अशा विविध वस्तू मिळून आल्या होत्या, तसेच सुमारे २०० मीटरवर असलेल्या पाण्याच्या पाठात एक डोक्याची कवटीही आढळून आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच दिवशी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली.

दरम्यान, या घटनेला आठवडा होऊन गेल्यानंतरही पोलिसांना या महिलेच्या उर्वरित मृतदेह, तसेच त्याचे अवशेषही मिळून आले नाहीत. त्याचबरोबर मृतदेहाची ओळखही अद्याप पटविता आली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी ही माहिती दिली आहे.