सातारा प्रतिनिधी | शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून साडेदहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सीमा संजय कोकरे (वय ४२, रा. शाहूपुरी) असे महिलेचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून साडेदहा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याबाबतची फिर्याद दाखल झाल्यानंतर तातडीने तपास करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते. त्यानुसार या पथकाने फिर्यादीच्या घरी जाऊन चौकशी केली.
यावेळी सहा महिन्यांपासून त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेवर अधिकाऱ्यांचा संशय आला. त्यांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
पथकातील अधिकारी ढेरे, हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, ज्योतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमीत मोरे, संग्राम फडतरे, माधुरी शिंदे, कोमल पवार व गायत्री गुरव हे या कारवाईत सहभागी होते.