कराड प्रतिनिधी | मलकापूर येथील बैलबाजार रस्त्यालगत असलेल्या गणेश मंदिरातून रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली धातूची मूर्ती चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून मुलांकडून रोकड व मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर येथे बैलबाजार रोडवर गणेश मंदिर आहे. त्या मंदिरातून रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेल्या मूर्तीची चोरी झाली होती. याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी या चोरीचा छडा लावण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांना दिल्या होत्या.
उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, हवालदार विजय मुळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, आनंदा जाधव, धिरज कोरडे, अमोल देशमुख, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सैदापूर येथून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीची रक्कम व मूर्ती पोलिसांनी हस्तगत केली आहे. या अल्पवयीन मुलांनी इतर मंदिरातही चोरी केल्याचा संशय असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.