सातारा प्रतिनिधी : फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे व त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पावर दि. ५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचा छापा पडला होता. तब्बल पाच दिवसांनंतर आयकर विभागाचे अधिकारी यांनी सरोज व्हिला सोडला. या काळात रामराजे यांनी सोमवारी सकाळी मात्र, सामाजिक माध्यमांवर स्टेटस ठेवत सुरवात तुम्ही केली, मी शेवट करणारच, असा गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली आहे.
संजीवराजे यांच्या निवासस्थानी झालेली कारवाई रामराजे यांना चांगलीच जिव्हारी लागली असून छाप्यातील राजकीय काटा काढण्यासाठी ते संघर्षाच्या तयारीत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन रामराजे कोणता डाव बाहेर काढणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काय म्हटले…
आयकर विभागाच्या पाच दिवसांच्या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत फक्त दोन लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ती रक्कम देखील आयकर विभागाने परत केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.