कराड प्रतिनिधी | कराड शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर गुरुवारी सायंकाळी डीवायएसपी पथकाने छापा टाकला. यामध्ये 36 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह सुमारे तीन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची पाच पथके तयार करण्यात आली होती.
त्यानुसार गुरुवारी शहर परिसरातील कार्वे नाका, मंडई, एस. टी. स्टॅन्ड परिसर, मलकापूर, नवग्रह मंदिर परिसर, वारूंजी फाटा, खोडशी असे एकूण सात ठिकाणी पोलिसांनी मटका, जुगार, अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांवर 36 जणांवर कारवाई केली. यामध्ये अवैध जुगाराचे साहित्य, 1 लाख 57 हजार 780 रुपये रोख, 15 मोबाईल, 5 दुचाकी, अवैध देशी दारुच्या 23 बाटल्या असा एकूण 3 लाख 80 हजार 898 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, अर्चना शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चौधरी, अनिल पाटील, सहाय्यक फौजदार सपाटे, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, प्रशांत चव्हाण, सागर बर्गे, दिपक कोळी, अनिकेत पवार, मयूर देशमुख, अमोल वाण श्रुती गोळे व आर.सी.पी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.