पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टी काळात डोंगरात भूस्खलन झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात अन्यत्र स्थलांतर करावे लागणाऱ्या ढेबेवाडी खोऱ्यातील जिंती परिसरातील वाड्या-वस्त्यांची केवळ पावसाळ्यापुरतीच प्रशासनाला आठवण येत असल्याचा अनुभव तीन वर्षांपासून येत आहे. यातील जितकरवाडीच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळाली असली तरी तेही अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. तसेच जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडीसह जोशेवाडीतील राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात भूस्खलन होण्याची भीती लागून राहिली आहे. पावसाळ्यात प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी लोकांतून केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात या विभागातील जिती आणि काळगाव खोऱ्यात मोठीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी, जोशेवाडी, काळगाव येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन दरडी निसटून घरांच्या दिशेने घसरत आल्याने तेथील अनेक कुटुंबे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली होती. अनेक दिवस त्यांचा शाळा, तसेच मंगल कार्यालयांत मुक्काम होता. पुढे पावसाचा जोर ओसरल्यावर संबंधित वाड्या-वस्त्यांना भूगर्भतज्ज्ञानी भेट देऊन भूसर्वेक्षण व तपासणी केली. लवकर पुनर्वसन करा अन् आमच्या जीवाचा घोर मिटवा, अशी विनंती ग्रामस्थांनी त्यावेळी संबंधितांकडे केलेली होती.
त्यानंतर त्याबाबत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, यातील अजून जितकरवाडी वगळता अन्य वाड्या- वस्त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली आहे. जितकरवाडीची पुनर्वसन प्रक्रिया सुरू झालेली असली तरी अजून तिलाही अंतिम स्वरूप आलेले नाही. दोन वर्षांपासून एकही कुटुंब पुनर्वसित झालेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात प्रशासनाला संबंधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागत आहे. जितकरवाडीतील अनेक मुंबईकर रहिवाशांनी आपली गावाकडची माणसे सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईला राहण्यास गेल्याचेही सांगण्यात आले.