पाटण तालुक्यातील ‘या’ गावानं चेरापुंजीलाही मागं टाकलं ; महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा विक्रम

0
105
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावाने 31 मे 2024 ते 1 जून 2025 या कालावधीत 7,359 मिलिमीटर पावसाची नोंद करत महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये पाथरपुंजने देशातील प्रसिद्ध चेरापुंजीलाही (5,938 मिमी) मागे टाकले आहे.जून ते ऑगस्ट 2024 या तीन महिन्यांत पाथरपुंजमध्ये 7,359 मिमी पावसाची नोंद झाली, तर 2019 मध्ये याच गावाने 9,956 मिमी पावसाचा विक्रम नोंदवला होता. यंदाचा आकडा पुन्हा त्या दिशेने वाटचाल करत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या बाबतीत पाथरपुंज अव्वल असून, त्यापाठोपाठ वाळवण (6,738 मिमी), नवजा (6,250 मिमी), दाजीपूर (6,203 मिमी), निवळे (6,026 मिमी) आणि महाबळेश्वर (5,962 मिमी) यांचा क्रमांक लागतो. हवामान बदलामुळे या भागात पावसाची तीव्रता आणि प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पाथरपुंज आता केवळ ‘पावसाचे गाव’ न राहता हवामान अभ्यासकांचे लक्ष वेधणारे केंद्र बनले आहे.

सातारा, पुणे आणि अहिल्यानगरमधील १४ ठिकाणी शंभर मिलीमीटरहून जास्त म्हणजे अति मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १६३.५ मिमी पाऊस पडला आहे. फलटणमधील चार, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात दोन आणि पुणे जिल्ह्यातील दौंडमधील पाच आणि शिरूरमधील दोन ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडला आहे.

कोयना विभागाच्या दक्षिण टोकावर चांदोली अभयारण्यात येणारे हे गाव आहे. पाटण तालुक्‍यात हे गाव येत असले तरी सातारा, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर ते वसले आहे. या गावांतील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर हे गाव वसले असले तरी या ठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी वसंतसागर धरणात जात असल्याने हे धरण ओव्हरफ्लो होते.