नवजाचे पर्जन्यमान 4 हजारी; कोयना धरणातील साठा झाला ‘इतका’ TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरूच असून नवजाच्या पर्जन्यमानाने चार हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. तर कोयना, नवजाच्या पावसाचीही चार हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान महाबळेश्वरला झाला आहे. त्याचबरोबर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस असल्याने साठा 85.37 टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

सातारा जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिमेकडे कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरला धुवाॅंधार पाऊस झाला. यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. परिणामी कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पश्चिमेकडे पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७१ तर नवजाला ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ४७६ तर नवजा येथे ४ हजार ५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरलाही आतापर्यंत ३ हजार ७५५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात आवक घटली आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा होता. ८१.६२ टक्के धरण भरलेले आहे. त्याचबरोबर कोयनेतील विसर्ग कायम आहे. पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० आणि सहा दरवाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू असून हे पाणी कोयना नदीत जात आहे

Koyna Dam

Date: 30/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2147’02” (654.456m)

Dam Storage:
Gross: 85.37 TMC (81.11%)
Live: 80.25 TMC (80.14%)

Inflow : 35,401 Cusecs.

Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 107/3583
Navaja- 99/4154
Mahabaleshwar- 158/3913

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 124.79 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प : कोयना – 85 (80.62), धोम – 10.80 (80.00), धोम – बलकवडी – 3.40 (83.33), कण्हेर – 8.38 (82.97), उरमोडी – 7.22 (72.49), तारळी – 5.10 (87.18).
मध्यम प्रकल्प : येरळवाडी – 1.00 (87.04), नेर – 0.07 (16.81), राणंद – 0.03 (9.96), आंधळी – 0.12 (35.32), नागेवाडी- 0.08 (36.16), मोरणा – 1.4 (75.14), उत्तरमांड – 0.62 (70.57), महू – 0.89 (81.23), हातगेघर – 0.13 (50.04), वांग (मराठवाडी) – 2.13 (77.91) या प्रमाणे पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात सरासरी 19.9 मि.मी. पाऊस

सातारा जिल्ह्यात दि. 28 जुलै रोजी सरासरी 19.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 684.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 39.2 (630.7), जावली-मेढा – 22.4 (1191.7), पाटण – 33.9 (1052.7), कराड –18.7 (632.5), कोरेगाव –18.6 (508.4), खटाव – वडूज – 13.4 (387.7), माण – दहिवडी – 3.7 (295.4), फलटण – 2.7 (325.2), खंडाळा – 12.8 (282), वाई – 8.5 (606.2), महाबळेश्वर – 34.9 (2337.6) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

वीर धरण विसर्ग वाढवला

वीर धरणाची पाणी पातळी ५७९.५१ मीटर झाली असून धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४६३७ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता १३९११ क्युसेक्स करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरण व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.