चुलत्याच्या खून प्रकरणी पुतण्यांना जन्मठेप, प्रत्येकी 3 लाखांचा दंड; भाऊ-भावजय निर्दोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे समाईक जमीन वाटून देत नसलेल्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी दोषी धरून मृताच्या दोन पुतण्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ३ लाख रुपये दंड सातारा न्यायालयाच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी ठोठावला.

अनिकेत हणमंत सोनवलकर आणि शंभुराज हणमंत सोनवलकर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयताचा भाऊ आणि भावजयीची खून खटल्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, दंडाच्या ६ लाख रकमेपैकी ५ लाख रूपये भरपाई मृताच्या कुटुंबीयांना द्यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

समाईक जमीन वाटपाच्या वादातून फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी ७ च्या सुमारास कुऱ्हाड, लोखंडी गज आणि लोखंडी पाईपने केलेल्या हल्ल्यात ज्ञानदेव महादेव सोनवलकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयताचा भाऊ हणमंत महादेव सोनवलकर, भावजय सुनिता हणमंत सोनवलकर, पुतणे अनिकेत हणमंत सोनवलकर आणि शंभुराज हणमंत सोनवलकर यांच्यावर फलटण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक यु. एस. शेख यांनी या गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सातारा येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती वैशाली पाटील यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.

परिस्थितीजन्य पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी आरोपी अनिकेत हणमंत सोनवलकर आणि शंभुराज हणमंत सोनवलकर यांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावेत, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. हणमंत महादेव सोनवलकर, भावजय सुनिता हणमंत सोनवलकर या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.