पाटण प्रतिनिधी । सध्या सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने घाट मार्गावरील रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील मार्गावरील सोनपात्र वळणावरील दरड कोसळून रस्ता खचून गेला असल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बॅरल लावण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा घाट मार्गांना होत आहे. कारण कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटानजीक सोनपात्र वळण येथे दरड कोसळण्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान दरड हटविण्यासाठी त्या ठिकाणी जेसीबी रवाना करण्यात आले होते. मात्र, या मार्गावर जड वाहनांची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. दरड हटवण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असलेल्या कुंभार्ली घाटात दरड कोळण्याच्या घटना अधून मधून या घडत असतात. दरम्यान सातारा जिल्ह्यास रेड तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्याची व त्यामुळे रस्ता खचल्याची माहिती मिळताच मनसेचे वाहतुकसेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले हे कार्यकर्त्यांसह तत्काळ घटनस्थली दाखल झाले. त्यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दगडाने भरलेले बॅलर, झेंडे, आणि पट्टे लावून सावधानतेने प्रवास करण्याचे सूचित केले.
जुना विजापूर रस्ता म्हणून ओळख असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत अवघड असणारा कुंभार्ली घाट राज्यातील महत्वाच्या घाटामध्ये नोंदला गेला आहे. या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असतो. मात्र तरीही घाटातील रस्ता सुस्थितीत टिकत नाही. अतिशय अवघड वळणाचा असलेल्या कुंभार्ली घाटात तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. कित्येक दिवस खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. केवळ रिकामे बॅलर उभारून ठेवल्याने वाहतूकदारांसाठी ते तितकेच असुरक्षित ठरत आहे.