कोयना धरण 56 टक्के भरलं; कण्हेरमधून पाण्याचा विसर्गात वाढवला

0
18
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या पूर्व भागात पावसाची उघडीप असलीतरी पश्चिमेकडे दमदार हजेरी आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात ओढे, नाले भरभरून वाहू लागलेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढू लागला आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येऊ लागला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला आहे. सुमारे ५६ टक्के धरण भरले. तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यातच बहुतांशी मोठी धरणे ही ७० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत.

कोयना धरणात ३३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत असून तर कालपर्यंत धरणात ५८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातूनच १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १ हजार ६९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर नवजाला १ हजार ४६७ आणि महाबळेश्वर येथे १ हजार ६३६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. सध्या धरणात ७.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ७१ टक्के भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी दुपारपासून सांडव्यातून एक हजार क्यूसेक विसर्ग वाढविण्यात येणार होता. त्यामुळे वेण्णा नदीत सांडव्यावरून दोन हजार तसेच विद्युतगृहातून ७०० क्यूसेक पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कण्हेरमधून एकूण २ हजार ७०० क्यूसेक विसर्ग होणार होता.