कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात पूर्वीच्या झालेल्या वादाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा वडोली निळेश्वर येथील युवकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मुबिन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड), रिझवान गौस शेख (रा. कोणेगाव, ता. कराड), निहाल अस्लम पठाण (रा. सुमंगलनगर, कार्वेनाका, कराड) अशी पोलीस कोठडी सुनावल्या आरोपीची नावे आहेत. तर शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडोली निळेश्वर येथील शुभम कराड येथील वडार नाका चौकातील चर्च समोर सलूनचे दुकान चालवत होता. शनिवारी सकाळी शुभम आणि त्याचा भाऊ हिम्मत हे दोघे दुचाकीवरून कराडात त्याच्या दुकानात आले. त्यानंतर सुभांचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण हे दुपारी सडे बारा वाजण्याच्या सुमारास शुभम व हिम्मत या दोघांचा जेवणाचा डबा घेऊन दुकानात आले. त्यावेळी शुभमचा मित्र रिझवान शेख हा दुकानात होता. त्यानंतर रिझवान शेख व निहाल पठाण याने शुभमला कार्वे नाका येथे नेले.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कार्वेनाका येथीलऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चौकात मुबिन इनामदार याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शुभम याच्याशी वाद घालू लागला. यावेळी शुभमच्या चाकूने गळ्यावर, मानेवर, पाठीवर, पोटावर ठिकठिकाणी अकरा वार केले. यामध्ये शुभमच्या मृत्यू झाला. त्यानंतर मुबिन याने घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी मुबिनला रात्री दोन वाजता शेतातून घेतले ताब्यात
पोलिसांनी रिझवान शेख व निहाल पठाण या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. मुबिन फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली होती. पोलिसांना मुबिन हा मलकापूर येथील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुबिन याला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका शेतातून ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर रविवारी सकाळी मुबिन इनामदार, रिझवान शेख, निहाल पठाण या तिघांना कराड येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत युवकाचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.