कराड प्रतिनिधी । प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एक जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गौरव बाबासाहेब पवार, उदय उर्फ शेखर भिमराव पवार, सचिन निंबाळकर ( रा. राजमाची, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी बाबासाहेब पवार (रा. हजारमाची ता. कराड) यांची मुलगी राजमाची गावात राहणाऱ्या प्रविण पवार याच्यासोबत पळून गेल्याचा संशय होता. सदर प्रकरणाची माहिती आरोपी बाबासाहेब पवार व त्यांचे इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे सदरचे आरोपी हे त्या युवकाचे मागोव्यावर होते. दि. 30/10/2023 रोजी सकाळी 10.15 वाजण्याच्या दरम्यान आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातून पळून गेले.
त्याचा राग मनात धरुन आरोपी बाबासाहेब पवार (रा. हजारमाची ता. कराड जि. सातारा) हा व त्याचे साथीदार यानी युवकाचे वडील, भाऊ व पळून जाण्यास मदत केली असा संशय असलेले मयत इसम जनार्धन गुरव यांना राजमाची गावातून अपहरण करून सुनी घाटात नेले. तसेच त्या ठिकाणी मारहाण केली सदर मारहाणीत जनार्धन गुरव मृत्युमुखी पडल्याने आरोपी पसार झाले होते. आरोपीना कराड शहर डी.बी. पथकाने अवघ्या 2 तासात माहिती मिळवून त्यावेळी एकुण 06 आरोपीत यांना अटक केली. तसेच इतर आरोपीत यांचा शोध सुरु आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 नोव्हेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे, पोलीस उपनिरीक्षक पवार, स. फौ. संजय देवकुळे, हवालदार सचिन सुर्यवंशी, शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, धिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.