कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून तपासाची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा कोयनावसाहत परिसरात विठ्ठल मंदिरा समोरून एक संशयितास अटक केली.
निलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात दरोड्याची घटना घडल्यानंतर पोलिसांकडून ठिकठिकाणी रात्रीच्यावेळी वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, सोमवारी सुद्धा रात्रीच्यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सतीश जाधव, पोलीस नाईक संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव यांच्यासह कर्मचारी कोयना वसाहत येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपी निलेश चव्हाण हा दुचाकीवरून संशयास्पदरित्या वावरताना आढळला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाकडील दागिने लुटल्याचे कबूल केले. यावेलो पिलीसानी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे असलेली दुचाकीही जप्त केली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे कारवाईत प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सतीश जाधव, पोलीस नाईक संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, रईस सय्यद, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, संतोष लोहार, सोनाली मोहिते यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विभूते हे करत आहेत.