पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. परिणामी नद्या, ओढ्याची पाणी पातळी वाढू लागली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत नवजा येथे सर्वाधिक 133 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयना धरणात 1 TMC ने साठा वाढला आहे. सकाळपर्यंत धरणात 25.08 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. मुसळधार पावसामुळे कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजासह संपूर्ण कांदाटी खोरे चिंब झाले आहे.
शनिवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पाऊस खऱ्या अर्थाने पुन्हा सक्रिय झाला. रविवारीही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगर येथे 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे 133 आणि महाबळेश्वरमध्ये 44 मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला 1072 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजा येथे 1559 आणि महाबळेश्वरला 1517 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
कोयना धरणात एका दिवसांत जवळपास 1 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. कोयना जलाशयात प्रति सेकंद 7 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जलाशयाची पाणीपातळी 2066.08 फूट असून, एकूण पाणीसाठा 25.08 टीएमसी झाला आहे. 25 टीएमसीचा टप्पा धरणाने ओलांडल्याने काही प्रमाणात काळजी कमी झाली आहे.