कराड प्रतिनिधी । हल्ली उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागत नसल्याने काही तरुण तरुणी नोकरीसाठी चार पैसे देऊन मध्यस्थीकरवी नोकरी लागण्यासाठी पर्यटन करत आहेत. मात्र, पैसे देऊनही नोकरी न लागल्याने विश्वासघात, फसवणुकीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. अशाच नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याच्या घटना सातारा जिल्ह्यात सध्या घडत आहेत. अशीच घटना कराड आणि पाटण मधील तरुण तरुणींच्याबाबतीत घडली आहे.
नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ ते दहा युवक-युवतींची सुमारे ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून संशयीतांनी पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुमित पोपट जाधव (वय २५, रा. घोगाव, ता. कऱ्हाड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. विकास राजाराम थोरात (रा. सवादे, ता. कऱ्हाड), सुधीर सूर्यकांत वचकल (रा. वीर, ता. परंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील सवादे येथील विकास थोरात व पुरंदर जिल्ह्यातील वीर येथील सुधीर वचकल हे दोघेजण कराड तालुक्यातील विंग येथे ज्ञानवर्धिनी क्लासेस चालवितात. ते दोघेजण बेरोजगार युवक-युवतींना नोकरी मिळवून देतात, अशी माहिती सुमित जाधव याला मिळाली होती.
त्यानुसार त्याने मार्च २०२२ मध्ये विंग येथे जाऊन विकास थोरात व सुधीर वचकल या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी सुमितला जलसंपदा खात्यात नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. सुमितचा टाळगाव येथील मित्र अभिजीत महादेव चिंचुलकर यानेही नोकरीसंदर्भात तेथे चौकशी केली. दरम्यान, नोकरी लावण्यासाठी सुमित जाधव याने २७ एप्रिल २०२२ रोजी १ लाख रुपये संशयीतांना दिले, तसेच अभिजीत चिंचुलकर यानेही १ लाख रुपये दिले.
काही दिवसांनंतर पुन्हा सुमित याने आणखी २५ हजार रुपये दिले. मात्र, तरीही संशयीतांकडून नोकरी लावण्यात वारंवार टाळाटाळ केली जात होती. तसेच, पैसेही परत दिले जात नव्हते. सुमित जाधव व अभिजीत चिंचुलकर यांनी विचारणा करून संशयीतांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. अखेर आपल्यासह इतर युवक-युवतींची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच सुमित जाधव याने कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.