सातारा प्रतिनिधी | अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी नुकताच २५ नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना हेल्मेट सक्तीबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार रस्ते अपघातातील मृत्यू व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सातारा जिल्ह्यात लवकरच पोलिसांकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे आता दुचाकीचालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरावे लागणार आहे. त्यामुळे हेल्मेटसंदर्भातील कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला वेग येणार आहे.
राज्यामध्ये रस्ते अपघातात मृत्यू व जखमी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जातात. तरीही अपघातांबरोबरच मृत्यू व जखमींची संख्या नियंत्रणात येत नाही. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याचा शोध घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार राज्यात सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने नुकतीच पुण्यासह राज्यातील अन्य काही शहरांमध्ये पोलिस, जिल्हा प्रशासन व वाहतूक क्षेत्राशी निगडित व्यक्तींची संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी अपघातांचा व त्यामध्ये होणाऱ्या मृत्यू व जखमींच्या संख्येचा आढावा घेतला. त्यामध्ये दुचाकी अपघातांमध्ये मृत्यू व गंभीर जखमी होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले, तसेच हेल्मेटचा वापर होत नसल्याने ही संख्या वाढत असल्याचेही या समितीच्या निर्दशनास आले होते.
संबंधित समितीने राज्यातील दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या होत्या. याची दखल घेत वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी दुचाकीस्वार व सहप्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक करावे, तसेच कायद्यातील या तरतुदींचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक तसेच महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाला देण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्या १९८८ च्या कलम १२८ व १२९ च्या कलमांमध्ये याबाबतची तरतूद पूर्वीपासून आहे; परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांची संख्या रस्त्यांवर दिसून येते. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणीबाबतचे निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.
ई-चलन मशिनमध्ये नेमके कोण कोणते बदल?
अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ई-चलन मशिनमध्येही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी दुचाकीवर हेल्मेट नसलेल्या चालकावर किंवा त्याच्या पाठीमाग बसणाऱ्यावर एकाच हेडखाली कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे कोणावर कारवाई झाली? याची अचूक माहिती उपलब्ध होत नाही. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आजा ई-चलन मशिनमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विनाहेल्मेट असलेला चालक व पाठीमागे बसणारा अशा दोघांवर कारवाईसाठी स्वतंत्र हेड बनविण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुचाकीवर पाठीमागे असणाऱ्यालाही हेल्मेट वापरावे लागणार आहे.
नेमकं परिपत्रकात काय म्हटलं आहे?
‘मोटार वाहन कायदा’ १९८८च्या कलम १२८ आणि १२९ च्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असे अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कारवाईसाठी दोन स्वतंत्र ‘हेड’
वाहतूक नियभंगाच्या केस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ई-चलन मशीन’ मध्ये विना हल्मेट दुचाकीस्वार व विनाहेल्मेट सहप्रवासी या दोन्ही केसची कारवाई या एकाच ‘हेड’ खाली केली जात होती. त्यामुळे विनाहेल्मेट सहप्रवासी व विनाहेल्मेट दुचाकीस्वार यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती. त्यामुळे आता या ‘ई-चलन’ मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विनाहेल्मेट सहप्रवासी अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे दोन्हीची स्वतंत्र माहिती मिळणार आहे.