कोयनेसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून सोमवार आणि मंगळवारी पाटण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या तालुक्यातील मल्हारपेठ, निसरे भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसीवर गेला आहे.

सातारा जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. विशेष करून जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दाणादाण उडाली होती. लोकांना न घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. जवळपास १२ दिवस धो-धो पाऊस पडत होता. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यामुळेच जुलै महिना संपताना या प्रमुख धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला होता.

तसेच ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिले. पण, जोर कमी झाला होता. तरीही धरणांत पाण्याची आवक सुरू होती. परिणामी सर्वच धरणांत १२९ टीएमसीवर पाणीसाठा निर्माण झाला आहे. मात्र, पाच ऑगस्टनंतर पाऊस कमी होत गेला. तसेच त्यानंतर काहीदिवस उघडीप राहिली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले. पण, तीन दिवसांपासून पश्चिम भागातही पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. पश्चिमेकडील या पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी 2 हजार 469 क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसी झालेला. धरणातील विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आलेला आहे. तसेच इतर धरणक्षेत्रातही पावसाचे तुरळक प्रमाण आहे.