कराड प्रतिनिधी । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना आज पहाटे साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला असून ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही या पावसाचा फटका बसला.
कराड आणि पाटण तालुक्यात रविवारी पहाटे झालेल्या पावसानंतर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, भात व अन्य पिकांची सुरू असलेल्या काढणीत व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी ठप्प झाली आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यामुळे कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून ऊसतोड मजूर साखर कारखान्याच्या परिसरात व कराड-पाटण तालुक्यातील मोठ्या गावात दाखल झाले आहेत. ते राहत असलेल्या परिसरात पावसाचे पाणी साचून त्यांचे जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, अन्नधान्य भिजले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे वातावरण अजूनही कायम असल्याने ऊसतोडी एक-दोन दिवस बंद राहील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.