पाटण प्रतिनिधी | गेल्या चार दिवसांपासून पाटण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उरूलच्या पश्चिमेकडील फणशी ओढ्यावरील ठोमसेला जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले.
पाटणसह तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत सरासरी २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. रविवारी रात्री उशिरापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, कोयना जलाशयात प्रतिसेकंद १२ हजार ५३८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, वाजेगाव इथल्या ओढ्याच्या पाण्यानं कच्चा रस्ता वाहून गेल्यानं कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
मागील चोवीस तासात कोयनानगरमध्ये सर्वाधिक 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असताना सोमवारी देखील दिवसभरात तब्बल 95 मिलिमीटर पाऊस झाला. पावसामुळे वाजेगाव (ता. पाटण) इथल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाण्याच्या प्रचंड दाबानं वाजेगाव हद्दीतील कच्चा रस्ता वाहून गेला आणि कराड-चिपळूण मार्ग ठप्प झाला आहे. तसंच शेकडो वाहनं रस्त्यातच अडकून पडली आहेत.