सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, लाडकी बहीण सोहळ्याचे बॅनर पडले पाण्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा साताऱ्यात आज होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी (शनिवारी) रात्री साताऱ्यात मुसळधार पावसाने सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर चिखल केला. वादळी वारे आणि पावसामुळे लाडकी बहीण वचनपूर्तीचे बॅनर पाण्यात पडले.

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आठवडाभर वातावरणात उष्मा जावणवत होता. उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. भात पिकांची अवस्था नाजूक बनली होती. अशात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. रस्ते जलमय झाले. सातारा शहरात बेसमेंटमधील गाळ्यांमध्ये पाणी शिरलं. सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

पावसामुळं खरीपातील पिकांना संजीवनी मिळाली. विशेषतः भात पिकासाठी हा पाऊस पोषक ठरला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू असताना पुर्वेकडे मात्र कडक उन्ह होतं. त्यामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली होती. शनिवारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळालं.