पाटण प्रतिनिधी | पश्चिम घाटक्षेत्रात आठवड्या भरापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.
तब्बल १०५.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोटात मुसळधार सुरुच असून, आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणसाठा पुन्हा पावणेपाच अब्ज घनफुटाने वधारला आहे. कोयनेचा हा जलसाठा दोनतृतीय्यांश भरण्याकडे वाटचाल करीत असताना, सकाळी १० वाजलेपासून धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृह निम्म्या क्षमतेने कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात अल्पसा १,०५० घनफुटाचा (क्युसेक) जलविसर्ग सुरु केला आहे. सर्वच जलस्रोत वाहते झाले असून, जलसाठे भक्कम बनले आहेत.
कोयना पाणलोटात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर एकूण २,८१३, महाबळेश्वरला २१८ एकूण २,७२२ नवजाला २०२ एकूण ३,२८५ मिलीमीटर असा दिवसभरात सरासरी २२१.३३ (८.७२ इंच) एकूण २९४० मिलीमीटर (११५.७५ इंच/ वार्षिक सरासरीच्या ५८.८० टक्के) पावसाची नोंद आहे.
मंगळवारी दिवसभर प्रमुख जलाशयांवरही जोरधार सुरु आहे. त्यात कडवी धरणक्षेत्रात ५२ मिलीमीटर, वारणा ३६, कुंभी २३, तारळी ३५, मोरणा २५, धोम- बलकवडी २७, दुधगंगा व उरमोडी १२, धोम १७, ठोसेघर धबधबा ६१, नागेवाडी धरण परिसरात ६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, जोर येथे ९५, रेवाचीवाडीला ७४, मांडुकली ६२, गजापूर ५१, वाळवणला ४५, गगनबावडा येथे ४६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.