सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सराईत चोरट्यांसह एका सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ३५ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (रा. दीपक देवानंद मंजरतकर (रा. जामखेड, जि. अहमदनगर), राहुल हिरामण लष्करे (रा. काळाखडक, ता. मुळशी) आणि अजय एकनाथ चव्हाण (रा. गहुंजे, ता. मुळशी, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
नगरमधील दोघांकडून २५ तोळ्याचे दागिने जप्त
साताऱ्यातील बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील ९ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचे २१ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले यास अटक करून २६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीकडून १७ लाख ५० हजार रूपये किमतीचे २५ तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
कराडमधील घरफोडीचा गुन्हा उघड
कराड तालुक्यातील गोटे गावातील बंद घरातून १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६५ हजार रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. त्याचाही छडा लावण्यात एलसीबीला यश आलं आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून राहुल हिरामण लष्करे आणि अजय एकनाथ चव्हाण या सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. याच आरोपींकडून अन्य तीन गुन्हेही उघडकीस आले. तीन गुन्ह्यांत चोरीला गेलेले एकूण ७ लाख रूपये किंमतीचे १० तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दोन वर्षात चार कोटी सात लाखांचा ऐवज जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीसह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये एकूण कोटी ७ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे.